नायगाव शहरात 30 एप्रिल पर्यंत जनता कर्फ्युला मुदतवाढ,कालच्या आकडेवारीत चांगला परिणाम निष्पन्न

*************************************************

कोरोनाची साखळी पूर्णपणे तोडण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाचा निर्णय

**************************************************

नायगाव दि 25 - कोरोना प्रसार संकटाची तीव्रता लक्षात घेऊन नायगांव शहरात पूर्वी दिनांक 21 एप्रिल ते दिनांक 25 एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यू (संचारबंदी) चा निर्णय लागू झाला होता. या जनता कर्फ्यू चे अत्यन्त चांगले परिणाम पुढे आल्यानंतर कोविड महामारी पूर्णपणे हद्दपार करण्याच्या उद्देशाने या कर्फ्युला दि 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला असल्याची माहिती नगरपंचायत प्रभारी मुख्याधिकारी नंदकुमार भोसीकर यांनी भ्रमणध्वनी वरून दिली आहे.या कर्फ्यु मुदतवाढीमुळे नायगाव शहरात आजून पाच दिवस मेडिकल दवाखाने वगळता इतर सर्व प्रतिष्ठाणे बंद राहणार आहेत.

नायगाव व परिसरात कोरोना महामारीचे थैमान सुरू झाल्यामुळे कोरोना बाधेची साखळी तोडण्यासाठी नगर पंचायत ने जनता कर्फ्युचा निर्णय लागू केला होता,त्याचे अत्यन्त चांगले परिणाम या दरम्यान दिसून आले, कर्फ्यु लागू होण्यापूर्वी कोरोना नवीन बाधित रुग्णांची संख्या तीन अंकी संख्येपर्यन्त पोचली होती ती काल च्या आकडेवारी नुसार एक अंकी म्हणजेच 8 वर आली आहे.प्रशासनाच्या आवाहनाला सर्व नागरिकांनी मनोभावे प्रतिसाद दिल्यामुळेच रुग्णवाढ आटोक्यात आली यात शंकाच नाही,नागरिकांच्या जीवावर चालून आलेली महामारी कर्फ्यु मुळे दबल्याची सुचिन्हे दिसताच प्रशासनाने आता जनता कर्फ्युला दि 30 एप्रिल पर्यन्त मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे,या प्रयत्नामुळे नायगाव सह परिसरातून ही जीवघेणी महामारी पूर्णपणे हद्दपार होईल असा प्रशासनाला दृढविश्वास आहे,

नायगावची सातत्याने वाढत असलेली रुग्णसंख्या जनता कर्फ्यु मुळे लक्षणीय प्रमाणात कमी झाल्याची बाब स्थानिक सोशल मिडियातही चर्चिली गेली,बऱ्याच प्रतिष्ठित नागरिकांनीही कर्फ्युला मुदतवाढ देण्याच्या संकल्पनेचे स्वागतच केले, त्यामुळे नगर पंचायत प्रशासनानेही सांगोपांग विचार करून सध्याचा जनता कर्फ्यु 30 एप्रिल पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

या वाढीव कालावधीतही पूर्वीप्रमाणेच केवळ दवाखाने व मेडीकल स्टोअर्स चालू राहतील,बाकी हॉटेल्स, भाजीपाला, फळे मिठाई भांडार, किराणा,जनरल स्टोअर्स आदी सर्व दुकाने बंद राहतील असे निर्देशित करण्यात आले आहे. शहरातील लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, व बाहेर गावातील लोकांनीही नायगांव शहरात येवू नये,पूर्वी केले तसेच उत्तम सहकार्य सर्व नागरिकांनी आता 30 एप्रिलपर्यन्त करावे, या प्रशासनिक व सार्वजनिक निर्णयाचा अवमान केल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कलम 144 अन्वये कार्यवाही करण्यांत येईल याची नोंद घ्यावी असे ऑडिओ क्लिप द्वारे प्रशासनाने कळवले आहे.पहिल्या ऑडिओ क्लिप मध्ये 31 एप्रिल असा उल्लेख झाला होता त्यात दुरुस्ती करून 30 एप्रिल हा उल्लेख करून दुसरी क्लिप प्रसारित करण्यात आली आहे

कोरोनाच्या महामारीचे वाढते थैमान लक्षात घेऊनच जनता कर्फ्युचे उचललेले हे पाऊल असून शहरात विनाकारण गर्दी होऊ नये,बाधितांना उपचार व्यवस्था देणे सोयीचे जावे,नवीन रुग्णवाढीला प्रतिबंध बसावा, व या महामारीची साखळी तुटावी व ती कायमची हद्दपार व्हावी यासाठीच हे महत्वाचे पाऊल नगरपंचायत प्रशासनाने उचलले आहे. आजवरच्या टप्प्यात बऱ्याच अंशी चांगले यश आल्यामुळेच सदर वाढीव जनता संचार बंदी चा निर्णय लागू केल्याचे सांगण्यात आले आहे,नागरिकांनी सध्या संयम पाळला तर लवकरच या महामारीची दहशत संपुष्टात येईल व सर्वांना पूर्वीसारखेच मुक्त संचार स्वातंत्र्य उपभोगता येईल असा आशावादही भोसीकर यांनी ठामपणे व्यक्त केला आहे


--- बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि