चक्क कापडाच्याआडून गुटखा विक्री,प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेकीची व्यापाऱ्यांनी शोधली अजब युक्ती.

*************************************************

पोलिसांना देऊन असाही चकमा, गुटखा विक्रीचा नवा करिष्मा

*************************************************

नायगाव दि 03 - नायगाव येथील फिरस्ती कापड व्यापारी दुचाकी ,चारचाकी वाहनातून कापडाच्या गठ्ठ्या मध्ये चक्क बेकायदेशीर रीत्या गुटखा विक्री करत असल्याची माहिती पुढे आली असून कापड व्यापाऱ्याच्या या नव्या शक्कली ने सरकारी यंत्रणेसमोर नवे आवाहन उभे केले आहे.

कापडाच्या खाली दडलंय काय?

व्यसनी लोकांना आयुष्यातून उठवण्यात मशहुर असलेल्या गुटख्याला लॉक डाउन मुळे विशेष महत्व आले आहे, मुळात आपल्या राज्यात रसायन मिश्रित तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर कधी काळी मायबाप शासनाने बंदी आणली होती, शासन कोणाचेही असो ही गुटखाबंदी मात्र केवळ कागदोपत्री राबवण्याची किमया प्रशासनाकडून पार पडत आली आहे,गल्लीतल्या शेम्बड्या पोरांनाही सहजपणे उपलब्ध होणारा गुटखा अन्न व औषधी प्रशासनासह इतर संबंधितांनाच मात्र दिसतच नाही हीच या गुटखा बंदीतील मोठी गोम आहे, आहे.

मागील वर्षी लॉक डाउन च्या काळात केवळ गुटखाच नव्हे तर गोर गरिबांचा विरंगुळा समजला साधा तंबाखू ही कृत्रिम टंचाई करून दहा ते पंधरा पटीच्या चढ्या दराने विकून ठोक व्यापाऱ्यांनी आपली चांदी करून घेतली होती, नांदेड जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या लॉक डाउन मध्येही थोड्या फरकाने असाच अनुभव येत असल्याचे शौकिनांचे म्हणणे आहे,

अतिग्रामिण भागातही सहजपणे उपलब्ध होणाऱ्या गुटख्यावर अधून मधून पोलीस प्रशासना कडून मात्र कारवाई केली जाते, मराठवाड्यात या गुटख्याची आवक प्रामुख्याने तेलंगाणा, कर्नाटक च्या काही शहरातून चोरट्या मार्गाने सुरू असते,नायगाव हे शहर नांदेड हैद्राबाद महामार्गावर आहे, तसेच तेलंगणा ,कर्नाटक राज्याला जवळ असनारे शहर आहे. येथे मोठी व मध्यवर्ती बाजारपेठ असून राज्यात बंदी असलेला गुटखा परराज्यातून आणून मराठवाडा व इतर भागात जोमाने पुरवठा करणारी टोळी येथे सक्रिय आहे. गोळ्या बिस्कीट विक्री च्या माध्यमातून गुटखा विकताना पकडल्याच्या घटनां यापूर्वी घडल्या आहेत,गुटखा तस्करीच्या त्या पद्धतीची प्रशासनाला माहिती कळल्यामुळे आता या तस्करांनी नवीन शक्कल शोधली आहे, फिरस्ती कापड व्यापारी या भागात आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनातून कापडाच्या गठ्ठ्यातुन बिनदिक्कतपणे गुटखा विक्री करीत असताना दिसून येत आहेत. काही ग्रामीण भागातील किराणा दुकानदार अशा फिरस्ती कापड व्यापाऱ्याच्या घरून कापडाच्या गठ्ठ्यात गुंडाळून गुटख्याच्या बॅग घेऊन जात असल्याचे आढळून आल्यामुळे फिरस्ती कापड व्यापा-याच्या या नव्या युक्तीची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

सध्या लॉकडाउन असल्याने पोलीस जागोजागी तैनात असून बंदोबस्तावरील पोलिसांचा ओळखीचा लाभ घेत फिरस्ती कापड व्यापारी आपल्या वाहनातून गुटखा गावोगावी पुरवठा करीत आहेत. या नव्या युक्तीने नायगाव,रामतीर्थ,कुंटुर पोलिसाच्या समोर एक नवे आव्हान उभे राहिले आहे. नायगाव तालुक्यातील एक शहर व शेजारचे एक खेडे गाव गुटखा व अवैध धंद्या चे माहेरघर बनले आहे.येथील गुटखा किंग यांचे राजकीय व पोलीस मंडळीत लागे बांधे आसल्याने बंदीच्या काळात अनेक युक्त्या व क्लुप्त्या लढवून अवैध धंदे बिनबोभाट पणे सुरू आहेत. या सर्व बाबीना पोलीस प्रशासनाचे अभय आहे का? असा प्रश्न प्रकर्षाने विचारल्या जात आहे.पोलिसांचे या व्यवहाराला अभय नसेल तर कापडाच्या खाली दडलंय काय याचा शोध लावून किमान आठवड्यातुन एखादी कारवाई करावी व गुटखा तस्करात दहशत निर्माण करावी अशी मागणी या भागात जोर धरत आहे.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि