गद्दारी भोवली.. कहाळा येथील सरपंचाचा दोन दिवसातच चक्क डांगोरी देऊन राजीनामा


पदासाठी सरपंचपतीचा विरोधी गटाशी हात मिळवणीचा कारनामा अंगलट आल्याची घटना

************************************************

नायगाव दि 15 - ज्या पॅनल कडून विजय मिळाला त्याच पॅनलला धोका देऊन कहाळा येथील सरपंचपद मिळवले परंतु केवळ दोनच दिवसात ही गद्दारी अंगलट आल्यानंतर चक्क गावातून डांगोरा पिटुन राजीनामा देण्याची वेळ

कहाळा येथील नवनियुक्त सरपंच श्रीमती साफीयाबी नजीर बिरबल यांच्यावर आल्याचे दिसून आले.

वरकरणी अत्यंत सरधोपट दिसणारे गावगाड्यातील राजकारण कधी कधी आंतरराष्ट्रीय राजकारणापेक्षाही नागमोडी व घातक वळणे घेत असते,याचीच प्रचिती नुकतीच कहाळा या छोट्या गावात दिसून आली,धोके,लबाडी,बनवाबनवी,घोडेबाजार अशा लोकशाहीतील अवांच्छित बाबी मोठ्या राजकारणात उघडपणे घडतांना दिसून येत असतात परंतु सरळ मार्गाने जीवन जगणाऱ्या ग्रामिंणाना अशा राजकारणाशी घेणेदेणे नसते,

कहाळा गावच्या सरपंच होण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या श्रीमती साफीयाबी नजीर विरबल यांनी निवडणुकीनंतर आपल्या पॅनलसोबत गद्दारी केली, आपले पॅनल आपल्याला सरपंच होऊ देणार नाही अशी खात्री असल्यामुळे त्यांनी विरोधी गटाशी हातमिळवणी केली व त्या गावच्या कारभारी झाल्या,परंतु महत्वाकांक्षा सफल झाल्यानंतर केवळ दोन दिवसातच त्यांनी चक्क डांगोरा पिटुन आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे ही बातमी तालुक्याच्या राजकीय पटलावर जोरदार चर्चेचा विषय बनली आहे.

दि. १० केबुवारों रोजी कहाळा बु.येथील सरपंच पदाची निवड होती.येथील ग्रा.प.निवडणुकीत सत्ताधारी लुंगारे गटाला 5 तर विरोधी कहाळेकर गटाला 4 जागा मिळाल्या होत्या,श्रीमती साफीयाबी यांचे पती

नजीर बिरबल यांनी कहाळेकर गटाशी संगनमत करून आपल्या पत्नीला सरपंच पदावर विराजमान केले,आपल्याच सदस्याने गद्दारी केल्यामुळे लुंगारे गटाला बहुमत असूनही सरपंचपदावर हक्क सांगता आला नाही,सरपंच पद मिळवण्यासाठी या दाम्पत्याने दिलेला धोका गावकऱ्यांना अजिबात आवडला नसावा,कारण त्याच दिवशी भर रस्त्यात सरपंच पती नजीर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला,हमरस्त्यावर काहीजणांनी नजीर यांच्यावर हल्ला चढवला परंतु त्यांना वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही,धोका झाल्यामुळे लुंगारे गट मदतीला आला नाही तर ज्यांच्याशी हातमिळवणी केली त्या गटानेही नजीर यांचा बचाव करण्यात फुकटची बिलामत का घ्यावी या भावनेतून स्वारस्य दाखवले नाही,

आज त्यांना धोका दिला उद्या आपल्यालाही धोका होऊ शकतो या जाणिवेतून नवीन दोस्ताण्यातली मंडळीही नजीर यांच्या बचावासाठी पुढे आली नाही,

या प्रकारामुळे नजीर दाम्पत्याला आपली चूक कळली,गावच्या सरपंच पदावर आपल्या पॅनलच्या लोकांना धोका देवून सरपंच झाल्याने आपली गावातील प्रतिष्ठा तर गेलीच पण, भर रस्त्यात मार खाताना मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही ,मारहाणीमुळे अपमानीत झालेल्या नजीर बिरबल यांनी अखेर जुने पॅनल प्रमुख सुनील लुंगारे यांची भेट घेऊन आपली चुक कबुल केली आणि झालेल्या चुकीबदल गावात दवंडी देऊ्न राजीनामा देणार असल्याचेही जाहीर केले.

दि. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात च्या दरम्यान पंचायत समिती कार्यालयात येऊन सरपंच साफीयाबी नजीर बीरबल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या वेळी गावचे काही ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते. या नाट्यमय घडामोडी बद्दल पॅनलप्रमुख सुनील लुंगारे यांच्याशी संपर्क साधला असता नजीर बिरबल यांना त्यांची चुक कळाली. पश्चात्ताप झाल्यामुळे त्यांनी सरपंचपदाचा त्याग केला. असे लुंगारे यांनी सांगितले.

साफीयाबी नजीरसाब बिरबल यांनी आपण सरपंच पदाचा राजीनामा देणार असल्याचे गावात डागोंरी देऊन जाहीर केले ही घटना मात्र विशेष व ऐतिहासिक ठरली. एखाद्या लोक नियुक्त सरपंचाने डांगोरा पिटुन पद सोडल्याची ही पहिलीच घटना असावी.

कहाळा बु. गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सुनील लुंगारे व सेवा निवृत्त अभियंता सुरेश कहाळेकर यांच्या दोन पॅनल मध्ये निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली होती.या निवडणुकीत युवा कार्यकर्ते व माजी सरपंच सुनिल लुंगारे गटाचे ९ पैकी ५ सदस्य निवडून आले तर विरोधी कहाळेकर गटाचे ४ सदस्य निवडून आले. सरपंच पद सर्वसाधारण पुरुषासाठी सुटले असल्यामुळे आपल्यास सरपंच मिळणार नाही हे ग्रामपंचायत सदस्या सवीयाबी यांचे पती नजीर बिरबल यांना खात्रीलायकरित्या कळून चुकले होते. त्यांची महत्वाकांक्षा ओळखून विरोधी पॅनलने आमच्याकडे या आणि सरपंच व्हा, असे अमिष दाखवले असता ते सहजपणे जाळ्यात अडकले व निवडून देणाऱ्या गटाशी बेईमानी करत कहाळेकर गटाशी हात मिळवणी केली होती, ती महागात पडली असून दोन दिवसात राजीनामा देण्याची नामुष्की या सरपंचावर आली,राजकारणात बोकाळलेल्या स्वार्थी प्रवृत्तीचे दर्शन घडवणाऱ्या या घटनेची तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर


Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि