टेंभुर्णीला तब्बल 15 वर्षांनी कलंकीत करणारी ठरली पाडवा पहाट - मोठ्या भावानेच केला छोट्याचा खून


नायगाव दि 13 - खुनाच्या मालिकेबाबत काही वर्षांपूर्वी गाजलेल्या टेंभुर्णी ता नायगाव या गावात 2005 नंतर तब्बल 15 वर्षांनी खुनाची घटना घडली असून,कौटुंबिक वादातून गुढीपाडव्याच्या दिवशीच मोठ्या भावानेच लहान भावाच्या डोळ्यात आधी तिखट टाकले व नंतर धारदार शस्त्राने वार करुन खुन केल्याची घटना दिनांक 13 रोजी पहाटे घडली आहे.या प्रकरणी वडीलांच्या तक्रारीवरुन नायगाव पोलीस ठाण्यात मुलाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

टेंभुर्णी ता नायगाव या गावात काही वर्षांपूर्वी अनेक खुनाच्या मालिका घडलेल्या आहेत, सन 2005 मध्ये एका माजी सरपंचांचा खून झाल्या नंतरमात्र या गावात आजवर अनुचित प्रकार घडला नव्हता, त्यामुळे 15 वर्षांनंतर हे गाव रेड झोन मधून ग्रीन झोन मध्ये आले होते,या टेंभुर्णी गावाला पुन्हा एकदा कलंकीत करणारी घटना आणि तीसुद्धा पाडव्याच्या पहाटेच घडली आहे.नववर्षारंभाचाच मुहूर्त साधून

कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर मोठ्या भावाने आपल्या छोट्या भावाचाच घात केल्यामुळे टेंभुर्णी सह परिसरातील अनेक गावची जनता हळहळ व्यक्त करत आहे..

सदर घटनेची माहिती गावकऱ्या कडून समजताच नायगावचे पोलिस उपनिरीक्षक बाचावार यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सिध्देश्वर धुमाळ यांनीही टेंभुर्णी येथे भेट देवून घटनेची माहिती घेतली.

याबाबत अधिक माहिती अशी की, नायगाव तालुक्यातील टेंभुर्णी येथील माधवराव वडजे यांना दोन मुले आहेत, मोठ्याचे नाव संदीप आहे तर दुसरा विश्वजित हा हैद्राबाद येथे काम करून त्याचा वडील भाऊ संदीप याला पैसे आणून द्यायचा, पैश्यांच्या हिशेबावरुन या दोन भावात मागच्या एक दिड वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. एक वर्षापूर्वी या दोन भावात असेच जोरदार भांडण सुरू असतांना संदीप वडजे यांची पत्नी ते भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडली असता विश्वजितने त्यांच्यावरच चाकुने हल्ला केला होता.या घटनेनंतर या दोन भावातील वाद अत्यंत विकोपाला गेला. काही नातेवाईकांनी मध्यस्थी करुन त्यांच्यातील वाद तेव्हा मिटवला व दोघांना वेगळे केले होते.

वाद मिटला असला तरी संदीपची पत्नी अपयाच्या भीतीने नांदायला येण्यासच तयार होत नव्हती. त्यामुळे याचा राग संदीपच्या डोक्यात होता. त्याचबरोबर विश्वजित सुद्धा अधूनमधून तुला बघतो अशा धमक्या देत होता त्याच्यामुळे आपल्या जीवितास धोका होवू शकतो अशी भावना वडील भावाच्या मनात घर करून बसली होती त्यामुळे छोट्या भावाचा काटा काढल्याशिवाय आपण सुखी होणार नाही अशी मनाशी पक्की खुनगाठ त्याने बांधून ठेवली होती. आणि तशी संधी सोमवार च्या रात्री त्याला चालून आली.

टेंभुर्णी येथील नवी आबादीमध्ये कॅनालच्या बाजूला विश्वजित नवीन घराचे बांधकाम करत होता.बांधकामावर काम करून थकून भागून सोमवारच्या रात्री बांधकाम सुरू असलेल्या घरासमोरच तो झोपला होता, पाडव्याच्या पहाटे झोपेत असलेल्या विश्वजितच्या डोळ्यात आधी संदीपने तिखट टाकले व त्यानंतर धारदार शस्त्राने त्याच्या गळ्यावर जीवघेणा वार केला. या हल्ल्यात विश्वजीत जागीच गतप्राण झाला.

या प्रकरणी मयताचे वडील माधवराव विठ्ठलराव वडजे यांनी नायगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन संदीप माधवराव वडजे याच्या विरोधात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी संदीप वडजे यास अटक ही करण्यात आली आहे.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बिलोली सिध्देश्वर धुमाळ करत आहेत.

या घटने मुळे पूर्वी खुनाच्या मालिकेने गाजलेले टेंभुर्णी गाव पुन्हा चर्चेत आले असून परवाच शांततेचा पुरस्कार करत इथली ग्राम पंचायत बिनविरोध काढण्यात सज्जन वडजे या युवकास यश आले होते,त्या पार्श्वभूमीवर या घटनेने गावाला पुन्हा गालबोट लागल्याची भावना एका ज्येष्ठ नागरिकाने बोलून दाखवली, ग्रीन झोन मध्ये आलेले गाव पुन्हा रेड झोन मध्ये गेले अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली आहे.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि