नायगाव व नरसीत जनता कर्फ्यूला नागरिकांचा मनःपूर्वक प्रतिसाद ; सर्वत्र सामसूम


नायगाव दि 23- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नायगाव नगर पंचायत व नरसी ग्रामपंचायतीने केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाअसून व्यापारी बांधवांनीही या जनता कर्फ्यूत स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवलाआहे. या दोन्ही शहरात कर्फ्यु लागू झाल्यापासून सलग तिसऱ्या दिवशीही अकारण कोणीही रस्त्यावर फिरकत नसल्याने सर्वत्र शांतता दिसून येत आहे.या महत्वाच्या कोरोना प्रतिबंधात्मक कार्यवाही साठी नायगाव नगरपंचायत व ग्रामपंचायत नरसी प्रशासन,सरपंच व पोलीस अधिकारी,कर्मचारी भरउन्हातही कठोरपणे आपली भूमिका बजावताना दिसून आले.

बुधवार दिनांक 21 पासून जनता कर्फ्युला सुरुवात झाली पहिल्याच दिवशी नायगाव नगर पंचायतचे मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर यांनी आपल्या पथकासोबत बाजारपेठेत पाहणी फेरी पार पाडली, यावेळी सर्व दुकाने बंद दिसल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. दुसरीकडे तसेच नरसी ते नांदेड रोडवर सकाळी सकाळी भाजी- पाला बाजार सुरू झाली असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र भिलवंडे यांना मिळताच त्यांनी शिवसेना स्टाईलमध्ये हे प्रकरण त्वरेने हाताळले,भाजीपाला विक्रेत्यांशी सविस्तर चर्चा करून ग्रामपंचायतने पुकारलेल्या पाच दिवसांच्या जनता कर्फ्यूत सहभाग नोंदवा असे कळकळीचे आवाहन त्यांनी केल्यानंतर भाजी पाला विक्रेत्यांनी दुकाने दिवसभर बंद ठेवली हे विशेष.

परिसरात कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत वेगाने वाढत आहे. सध्या संचारबंदीही लागू असली तरी किराणा, भाजीपाला, पेट्रोल, मेडीसीन याकारणाचे निमित्त साधून ग्रामीण भागात नागरिक मोठ्या बेफिकीरीने रस्त्यावर सैरावैरा फिरत होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन नगर पंचायत प्रशासन नायगाव यांच्या सोबतच नरसी ग्राम पंचायती चे सरपंच गजानन भिलवंडे यांनीही त्वरेने जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेतला,या कर्फ्यूला मात्र नागरिकांनी मनःपूर्वक प्रतिसाद दिल्याचे दिसुन आले,कोरोना महामारीला रोखण्यासाठी गावपातळीवर सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असून प्रत्येक गावागावांत जनजागृती करणे आवश्यक आहे. शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करणेही गरजेचे आहे.

नरसी येथून जाणाऱ्या महामार्गावरील चौकाच्या चारही दिशेने सामसूम झाल्याचे दिसून आले. जवळच्या खेडेगावातील एकही नागरिक खरेदी विक्रीसाठी नायगाव बाजारपेठेत व नरसीत फिरकलेच नाही. बाजारपेठबरोबर गावातील सर्व लहानसहान दुकानेही बंद होती. घराबाहेर कोणी फिरू नका अन्यथा कोरोना टेस्ट केली जाईल असा इशारा नरसी ग्रामपंचायतीने दिल्याने या इशाऱ्याचाही नेमका परिणाम झाला,टेस्ट च्या धास्तीने अनेकांनी बाहेर विनाकारण फिरकणेच टाळल्याचे दिसून आले.दरम्यान लोकांनी असाच संयम अजून काही दिवस बाळगला तर या जनता कर्फ्युचा निश्चितपणे चांगला परिणाम बघावयास मिळेल,व कोविड महामारीला अटकाव होईल अशा प्रतिक्रिया सतर्क नागरिकांतून ऐकावयास मिळत आहेत


--- बाळासाहेब पांडे,मांजरमकर


Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि