विरोधी पक्षात सक्रिय असलेल्या तसेच क्षेत्राबाहेरील लोकांना महत्वाची पदे, रा कॉ युवा कार्यकर्ते नाराज

*************************************************

राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष धोंडगेनी केलेल्या नियुक्त्याबद्दल नायगवच्या स्थानिक कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी, प्रदेशाध्यक्षाकडे तक्रारी रवाना

*************************************************

नायगाव दि 19- जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कार्यकारिणीचे विधानसभा अध्यक्ष व युवक रा कॉ तालुकाध्यक्षपदाची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. मात्र नायगाव तालुक्यातील नियुक्त्या जाहीर होताच वादाच्या भोव-यात सापडल्या आहेत,

नायगाव विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेला पदाधिकारी नायगाव विधानसभा क्षेत्रातील नायगाव,धर्माबाद व उमरी अशा तीन्ही तालुक्याकडे दुर्लक्ष करून चक्क देगलूर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्याला संधी देण्यात आली आहे, तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे सक्रिय काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तालुकाध्यक्षपदी बसवण्याची कसरत करून जिल्हाश्रेष्ठीनी पक्षातील तरूण निष्ठावंत जुन्या हाडाच्या कार्यकर्त्यांना डावलल्याचा दावा गजानन पवार होटाळकर यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी केला आहे.

नायगाव मतदार संघात असंख्य सक्षम पदाधिकारी असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वाच्या पदावर मतदार संघाबाहेरीलच नव्हे तर पक्षाबाहेरीलही लोकांची निवड केल्याने स्थानिक कार्यकर्त्यांत संतापाची लाट पसरली आहे.भविष्यात पक्षाचे कार्य वाढवण्याचा दृष्टीने स्थानिक व निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांना वरिष्ठांनी संधी देणे गरजेचे होते,परंतु निवडी जाहीर होताच स्थानिक कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाल्याचा तक्रारी सुरू झाल्या आहेत,या महत्वाच्या पदावर विधानसभा क्षेत्रातील तीन तालुक्यापैकी सक्रिय निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी न देता महत्वाची पदे उपऱ्या मंडळींना स्वाधीन करण्यात आली यात नेमका काय उद्देश आहे असा संतप्त सवाल कार्यकर्त्यातून विचारल्या जात आहे, या चुकीच्या कार्यपद्धती बाबतचे एक निवेदन प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना देण्यात आल्याची माहिती राकॉ चे क्रियाशील कार्यकर्ते गजानन पवार होटाळकर यांनी दिली,

रा कॉ प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा नांदेड जिल्ह्यात येत्या काही दिवसात येणार आहेत.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी जिल्हा भरातील विविध तालुक्यातील विधानसभा अध्यक्ष व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाची निवड नुकतीच जाहीर केली आहे.

रा कॉ युवक नायगाव तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आलेले अमोल जाधव हे भाजपाचे नेते राजेश देशमुख कुंटूरकर यांचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. ही बाब पुराव्यासह सिद्ध करता येईल असा आरोप गजानन पवार यांनी यावेळी केला आहे. अमोल जाधव यांनी आजवर राजेश कुंटूरकर यांच्यामागे तरूणांची एक मोठी फळी उभी केली असून अशा भाजप नेत्यांच्या सोबत करणाऱ्यांना आपल्या पक्षात महत्वाची संधी देने कितपत योग्य आहे असा प्रश्नही गजानन पवार यांनी विचारला आहे. शिवाय विधानसभा अध्यक्ष पदी निवड करण्यात आलेले पंडीत जाधव हे पदाधिकारी चक्क देगलूर विधानसभा संघातील कामरसपल्ली (ता. बिलोली) या गावचे रहिवासी आहेत. त्यांनीही नुकतीच आपल्या गावात भाजपाच्या गटाकडून आपल्या चुलत्यामार्फत ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती हेसुद्धा विशेषरित्या उल्लेखनीय आहे.

स्वतः ला राष्ट्रवादी कॉंग्रेस युवा नेता म्हणून घेणाऱ्या या नेत्याचा वावर खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार राम पाटील रातोळीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, रवी पाटील खतगावकर, श्रावण पाटील भिलवंडे, माणिकराव लोहगावे या भाजपातील जेष्ठ कनिष्ठ नेत्यांच्या वर्तुळातून आहे, विशेष म्हणजे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे ते धर्माबाद तालुकाध्यक्षसुद्धा आहेत . त्यामुळेच पंडित जाधव हे युवा नेते नेमके कोणत्या पक्षाचे व तालुक्याचे ? असा सवाल निष्ठावंत कार्यकर्त्यातून विचारल्या जात आहे.

विशेष म्हणजे निवड करण्यात आलेले हे दोन्ही पदाधिकारी आता पर्यंत तालुक्यात पक्षाच्या झालेल्या कोणत्याच चळवळीत कधी सहभागी नव्हते असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. नायगाव तालुका हा खूप जुना राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मधल्या काळात थोडीशी पडझड झाली असली तरी गेल्या दहा बारा वर्षा पासून तालुकाध्यक्ष भास्कर भिलवंडे यांनी उतरत्या काळात पक्षाची कमान सांभाळत तरूणांची एक फार मोठी फळी निर्माण केली आहे. तालुक्यात असंख्य सक्षम कार्यकर्ते असताना बाहेरच्या मतदार संघातील व बाहेर च्या पक्षात काम करणा-या लोकांची पक्षातील महत्वाच्या पदावर वर्णी लावण्यात आल्याने नायगाव विधानसभा मतदार संघातील युवक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यंक्त केली आहे.

जिल्हाध्यक्ष धोंडगे यांनी तालुकाध्यक्षांना विश्वासात न घेता घरी बसूनच पदाधिका-यांची निवड करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत असून. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कडेही तक्रार करण्यात आली आहे, येत्या काही दिवसात प्रदेशाध्यक्ष जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ त्यांना भेटणार असल्याचे पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते गजानन पाटील पवार होटाळकर यांनी सांगितले आहे.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि