लॉकडाऊन' मनोभावे पाळून सध्याची रूग्णवाढ रोखा; अन्यथा उपचार व्यवस्था कोलमडण्याची भीती! - पालकमंत्री


पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांचे जिल्ह्यातील नागरिकांना कळकळीचे आवाहन

*************************************************

गर्दी कमी झाली नाही तर नाईलाजाने कठोर 'लॉकडाऊन' करणार असा इशाराही दिला

*************************************************

सोमवारपासून नांदेडात 200 खाटांचे जम्बो कोविड उपचार केंद्र सुरू होणार

*************************************************

नांदेड, दि. 18 - जिल्ह्यात वरचेवर कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे,या पार्श्वभूमीवर प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना करतच आहे. पण सध्याचा रूग्णवाढीचा वेग कमी झाला नाही तर उपलब्ध असलेल्या सर्व उपचार सुविधा अपुऱ्या पडण्याची मोठी भीती आहे. कोरोना महामारीच्या प्रसाराचा झपाटा रोखायचा असेल तर सध्या 'लॉकडाऊन'चे अत्यन्त काटेकोरपणे पालन हाच एकमेव पर्याय आहे. रुग्णवाढ आटोक्याबाहेर गेली तर संपूर्ण उपचार व्यवस्थाच कोलमडून पडेल आणि अत्यंत कठोर 'लॉकडाऊन' शिवाय दुसरा काहीही इलाज हाती राहणार नाही, असा कळकळीचा संदेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना दिला आहे

रविवारी सकाळी समाजमाध्यमांवरून जिल्ह्यातील नागरिकांना संबोधित करताना ते बोलत होते. दोन दिवसांपूर्वी लोहा तालुक्यात कोरोना रूग्णाच्या मृत्युनंतर त्याच्या पत्नीने तीन वर्षांच्या मुलासह आत्महत्या करण्याच्या अति दुःखद घटनेचा संदर्भ देत कोरोनामुळे समाजमनावरही मोठा आघात झाल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेवरून कोरोना रूग्णांची आणि त्यांच्या कुटुंबाची मानसिक स्थिती कशी असेल, याची कल्पना येते. मी आणि माझे कुटूंबिय या बाधेच्या दुर्धर प्रसंगातून गेलो आहोत. अशा वाईट अनुभवाला सामोरे जाण्याची वेळ अगदी विरोधकांवरसुदधा येऊ नये, अशी संवेदना व्यक्त करत सध्याची परिस्थिती बिकट व चिंताजनक असली तरी आपण सर्वांनी मिळून धैर्याने या अवघड परिस्थितीवर मात करणारच असा दिलासाही ना. चव्हाण यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.

जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येला हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. नांदेड येथील २०० खाटांचे जंबो कोविड सेंटर उद्यापासून कार्यरत होणार आहे. तिथे ऑक्सिजनची सुविधा देखील उपलब्ध असेल. ग्रामिण भागातील नागरिकांना प्राथमिक उपचार किंवा ऑक्सिजनसाठी नांदेडच्या रूग्णालयात येण्याची गरज भासू नये, या दृष्टीने अनेक ग्रामिण रूग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रातही आवश्यक त्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. मध्यंतरी जिल्ह्यात ऑक्सिजन कमी पडेल अशी भीती वाटत होती. पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्यातील ऑक्सिजनची साठवण क्षमता वाढवण्यात येत असून,अगदी लवकरच सर्व १३ तालुक्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करतो आहोत, अशी महत्वपूर्ण माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आजच्या संवादात दिली.

जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा व अत्यावश्यक सेवांमध्ये अडचण होऊ नये म्हणून सध्याच्या टाळेबंदीमध्ये मुख्यमंत्र्यांनी काही अंशी शिथिलता दिली आहे. पण दुर्दैवाने बऱ्याच लोकांना या महामारीचे गांभीर्य अजूनही लक्षात आले नसल्याचे दिसत आहे,भाजीपाला मार्केट व रस्त्यावरील गर्दी फारशी कमी झालेली नाही.अजूनही बरेच जण विनाकारण घराबाहेर निघत असल्याची माहिती प्रशासनाने आपल्याला दिली आहे,नागरिकांनी या 'लॉकडाऊन'ला गांभिर्याने घेतले नाही तर कुठलीही मोकळीक न देता अत्यन्त कठोर 'लॉकडाऊन' लागू करण्याशिवाय राज्य सरकारकडे पर्याय राहणार नाही, असा इशाराही पालकमंत्र्यांनी यावेळी दिला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी लाखो अनुयायांनी त्यांना घरूनच अभिवादन केले. त्याचप्रमाणे पुढील काळात येणारे श्रीरामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, महाराष्ट्र दिन, ईद आदी सण-उत्सव तसेच महापुरूषांच्या जयंती-पुण्यतिथीला सुद्धा नागरिकांनी गर्दी न करता घरी राहूनच आपली श्रद्धा व्यक्त करावी, अशी आग्रहपूर्वक विनंती अशोक चव्हाण यांनी केली आहे.

कोरोनाविरूद्धच्या या लढ्यात प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी सेवाभावी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे, असेही आवाहनही पालकमंत्र्यांनी केले आहे. इच्छूक संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करावी. अशा संस्थांना कोविड सेंटरचे बाह्य व्यवस्थापन, कोरोना रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मदत करणे आदी कामांसाठी मदतीला घेता येईल, असे पालकमंत्री म्हणाले. या संकटकाळात अनेक संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी कोरोना रूग्णांच्या अंत्यविधीसारखी अवघड कामे केली. निव्वळ माणुसकीच्या नात्याने त्यांनी दिलेले हे योगदान कधीही विसरता येणार नाही, असे सांगून अशोक चव्हाण यांनी या सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्याला सलाम केला.

---श्रीकांत देव

मुख्य संपादक,नांदेडवैभव

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि