जिगरबाज अंगरक्षकाने पोलीस अधिक्षकांवर झालेला वार झेलला,दिनेश पांडे या जवानाचे सर्वत्र कौतुक


*************************************************

कायदा पायदळी तुडवणाऱ्यांना कायद्यानेच धडा शिकवण्याचे पालकमंत्री ना.चव्हाण यांनी दिले निर्देश

*************************************************

नांदेड दि 30 - धुळवडीच्या दिवशी हल्ला बोल कार्यक्रमात पोलिसांवर शस्त्रधारी शीख तरुणांनी केलेल्या निर्घृण हल्ल्याचा नांदेडकरातून तीव्र निषेध होत आहे,तर दुसरीकडे आपले कर्तव्य बजावतांना प्राण पणाला लावणाऱ्या पोलीस नाईक तथा पोलीस अधिक्षकांचे अंगरक्षक दिनेश पांडे यांच्या कर्तव्यदक्षतेचे सोशल मीडियातून मनोभावे कौतुक व्यक्त होत आहे

शीख धर्माच्या परंपरेनुसार दरवर्षी येथील श्री हुजूरसाहिब सचखंड गुरुद्वा-यात हल्ला बोल मिरवणूक काढण्यात येते,जिल्ह्यात सुरू असलेले कोरोना थैमान लक्षात घेता प्रशासनाने लॉक डाउन सह लादलेले इतर निर्बंध लक्षात घेऊन सदर उत्सवाचे साजरीकरण केले जावे अशा सूचना प्रशासनाने संयोजकांना दिल्या होत्या तसेच मिरवणुकीला परवानगी नाकारली होती,मुख्य संयोजकांनीही काळजी घेण्याबाबत व नियमावलीचे पालन करण्याबाबत हमी घेतली होती,याउप्परही काही अनुचित घडू नये यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर बॅरिकेट्स लावून स्वतः पोलीस अधिक्षकांसह अधिकारी व इतर फौजफाटा जातीने गुरुद्वारा प्रांगणात तैनात होता,दि 29 रोजी अरदास झाल्यानंतर शेकडोंच्या जमावाच्या मिरवणूकीने मुख्य प्रवेशद्वारा कडे मोर्चा वळवला,पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेट्स हटवत असंख्य शस्त्रधारी शीख युवकांनी आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवरच निर्घृण हल्ला चढवला,दिसेल त्या पोलिसांवर हातातील तलवारी,बरच्या,भाल्यानी वार करण्याचा उद्दाम प्रकार या तरुणांनी सुरू केला,कायद्याने हात बांधलेल्या पोलिसांकडे स्वतःचा बचाव करण्याखेरीज इतर कसलाही उपाय अवलंबता आला नाही,आणि अनेक पोलिसांना निमूटपणे जिव्हारी घाव सहन करावे लागले,अनेकजण गंभीर जखमी झाले,याचवेळी गेट क्रमांक 1 वर थांबून असलेले जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे व पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्याकडे एका बेफाम हल्लेखोराचे लक्ष गेले,आणि त्याने आपल्या हातातील भाला सुसाट वेगाने त्यांच्या दिशेने फेकला,याचवेळी तिथेच तैनात असलेले पोलीस नाईक तथा अधिक्षकांचे अंगरक्षक दिनेश रामेश्वर पांडे यांनी अत्यन्त चपळाईने अधीक्षकांना कव्हर करत आलेला भाल्याचा जिव्हारी वार आपल्यावर झेलला,मोठ्या पात्याचा असलेला सदर भाला पांडे यांच्या बरगडी पर्यन्त घुसला व ते जागीच कोसळले,तोवर सावध झालेल्या इतर पोलीस सहकाऱ्यांनी पांडे यांना उचलून तातडीने खाजगी रुग्णालयात हलवले,पांडे यांनी त्वरित उपचार मिळाल्यामुळे अनर्थ टळला,तब्बल पन्नास टाके घालून डॉक्टरांनी पांडे यांना झालेल्या अत्यंत गंभीर जखमेवर उपचार केले,त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस प्रशासनाने आज सांगितले,

आज दिवसभर नांदेड च्या सोशल मीडियातून या जिगरबाज जवानासाठी अनेक सतर्क नागरिकांतून सॅल्युट ची भावना व्यक्त करत होते,शिखांच्या पराक्रमी परंपरेला व नांदेड येथील शांततेला बट्टा लावणारा हा अतिप्रसंग थोडक्यात निभावला असला तरी अधिक्षकांचा अंगरक्षक आडवा आला नसता तर काय घडू शकले असते याची कल्पना करवत नाही,"होता जीवा म्हणून वाचला शिवा" या शिवकालीन उक्तीची आज प्रचिती आल्याची भावनाही पोलीस व नागरिकांतून व्यक्त होत होती


पालकमंत्र्यांनीही मनावर घेतले

आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर झालेल्या या निंदनीय हल्ल्याची पालकमंत्री ना अशोकराव चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली आहे,कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांना कायदेशीर मार्गानेच धडा शिकवण्याची भावना ना चव्हाण यांनी बोलून दाखवली,दरम्यान काल झालेल्या क्रूर हल्ल्यामुळे पोलीस यंत्रणाही तडफेने कामाला लागली असून विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी स्वतः जातीने लक्ष घालून कारवाईचे सत्र सुरू केले आहे,पोलिसांनी याप्रकरणी 400 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत तर जवळपास 20 आरोपितांना ताब्यात घेतल्याचे कळाले


--- श्रीकांत देव

मुख्य संपादक, नांदेड वैभव

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि